१५ डिसें, २००८

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो..
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते..
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील...

१३ डिसें, २००८

तू पाठमोरी होताना..

पापण्या ओल्या झाल्या,
तू परत फिरताना,
घन ओथंबून आले,
सांज अशी सरताना ॥

आठवणी जाग्या झाल्या,
विरह तुझा छळताना,
रात सारी जागून
गेलीचांदण्यात तुला शोधताना॥

सुंगधही विरून गेला,
पंख तुझे वेगावताना,
रंग सारे विस्कटले,
तू पाठमोरी होताना॥

किनाराही उदासून गेला,
ओहोटीत तू धावताना,
उचक्याही कंठात आल्या,
एकांत असा घालवताना॥

श्वासाही अडकून गेला,
तु नजरेआड होताना,
उर सारा भरून आला,
क्षितीजे अशी दुर जाताना॥

जीवनाच्या प्रवाहात..

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात..

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात..

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार..

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही..

नसतेस घरी तू जेव्हा...

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो।

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो,
ही धरा दिशाहीन होते, अन चंद्र पोरका होतो।

येतात उन्हे दारात, हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचुन जातो।

तव मिठीत विरघळणार्या, मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो।

तू सांग सखे मज काय मी सांगू या घरदारा,
सम ईचा जीव उदास, माझ्यासह मिण-मिण मिटतो।

ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनि झालो,
तुज वाचुन उमगत जाते, तुज वाचुन जन्मच अडतो।।

२६ नोव्हें, २००८

तू...

प्रेम माझे तूच आहे
प्रेयसी ही तूच आहे
साथ माझी तूच आहे
वेड माझे तूच आहे।।

स्वप्न माझे तूच आहे
स्वर्ग माझा तूच आहे
जिवनात या सार्या
सर्व काही तूच आहे।।

२० नोव्हें, २००८

|| श्री गणपती स्तोत्र ||

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका
भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधिती ||१||
प्रथम नांव वक्रतुंड दुसरे एकदंत तें
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र तें ||२||
पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नांव तें
सातवे विघ्नगजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववे श्री भालचंद्र दहावे श्रीविनायक
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ||४||
देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर
विघ्नभीती नसे त्याला प्रभु तु सर्व सिध्दी दे ||५||

१ जुलै, २००८

राधा ही बावरी

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

२० एप्रि, २००८

मुक्त कंठाने रडतो मी ...

रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी

विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी

का तूला आठवू... हाच विचार करतो मी

अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी

नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे

मनात माझ्या रोज ठरवतो मी

तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात

रोज तिथे एकांतात रडतो मी

नको दिसावा तुझा चेहरा

रोज देवास पाया पडतो मी

पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना

गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी

एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ

म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी

प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन

मुक्त कंठाने रडतो मी ........

१९ फेब्रु, २००८

मनुष्य


मी देवाला विचारले….

तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते ?…..

देव उत्तरला,…..

मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो.

तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाहि व भविष्यातहि जगत नाहि.

तो असा जगतो कि कधिच मरणार नाहि आणि असा मरतो कि कधिच जगला नाहि.

३ फेब्रु, २००८

तर...

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...

तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...

तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....
तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...

माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...
तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..

तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..

किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काही
तरीनजरेनच जाणता आलं तर...

हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!"